देशात १५ नोव्हेंबरपर्यंत ११.६३ लाख टन साखर उत्पादन; इस्माची माहिती

नवी दिल्ली : चीनी मंडी

भारतात चालू साखर हंगामात १५ नोव्हेंबरपर्यंत झालेल्या साखर उत्पादनात किंचित घसरण पहायला मिळत आहे. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत देशात एकूण ११.६३ लाख टन साखर उत्पादन झाल्याची माहिती इंडियन शुगर मिल असोसिएशनने (इस्मा) दिली आहे. गेल्या वर्षी याच काळात १३ लाख ७३ हजार लाख टन साखर उत्पादन झाले होते. पण, यंदा उत्तर प्रदेशमध्ये गळीत हंगाम उशिरा सुरू झाल्यामुळे आतापर्यंत झालेल्या एकूण उत्पादनात १५ टक्क्यांची घसरण पहायला मिळत आहे.

इस्माने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या हंगामात २३८ साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू झाले आहे. गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरपर्यंत ३४९ कारखाने सुरू होऊन, त्यांच्यात साखर उत्पादन होत होते. देशात सर्वाधिक साखर उत्पादन होत असलेल्या उत्तर प्रदेशात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ३८ साखर कारखाने सुरू झाले होते. तर, यंदा बहुतांश कारखाने नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात सुरू झाले आहेत. कारखाने उशिरा सुरू झाल्यामुळे उत्तर प्रदेशात आतापर्यंत केवळ १.७६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात ५.६७ लाख टन साखर उत्पादन झाले होते. पण, गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात या काळात ७८ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. यंदा याच काळातील साखर कारखान्यांची संख्या ७१ आहे.

महाराष्ट्राचा विचार केला तर, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर कारखाने लवकर सुरू झाले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक कारखान्या्ंनी गाळप सुरू केले. यात १०८ साखऱ कारखान्यांचा समावेश होता. त्यांनी मिळून १५ नोव्हेंबरपर्यंत ६.३१ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात हंगाम उशिरा सुरू झाला होता. ५ नोव्हेंबरच्या दरम्यान कारखाने सुरू झाले होते. त्यामुळे १६० कारखाने सुरू असूनसुद्धा १५ नोव्हेंबर २०१७ पर्यंत केवळ ३.२६ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा कर्नाटकमध्ये ३६ साखर कारखाने सुरू आहेत आणि त्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत १.८५ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्या वर्षी चालू कारखान्यांची संख्या ५९ होती आणि त्यांनी ३.७१ लाख टन साखर उत्पादन केले होते.

गुजरातमध्ये या हंगामात १४ कारखान्यांनी १.०५ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्या वर्षी याच काळात १५ कारखान्यांनी केवळ ८० हजार टन साखर तयार केली होती. तर, तमीळनाडूमध्ये चार साखर कारखान्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत ६० हजार टन साखर तयार केली आहे. गेल्या वर्षी त्यांच्या सहा कारखान्यांतून केवळ १७ हजार टन साखर तयार झाली होती.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here