नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुधारणा आणि कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल वापरण्यावर भर दिला आहे. आता ऊसासह अन्य पिकांपासून याची निर्मिती होईल. इथेनॉल उत्पादनासाठी ऊस आणि अन्नधान्याचा वापर होणार असल्याने देशभरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. त्यातून रोजगार संधीही वाढणार आहेत.
अन्न धान्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीची नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये धान्य, मोलॅसिस यांच्यापासून इथेनॉल उत्पादनाच्या प्रक्रियेसाठी आर्थिक मदत देण्यासाठी सुधारित व्याज योजना राबविण्याच्या प्रस्तावावरही चर्चा करण्यात आली.
समितीकडे एकूण ४१८ अर्ज आले असून त्यांची एकूण वार्षिक उत्पादन क्षमता १६७० कोटी लिटर आहे. या प्रस्तावांची शिफारस समितीने केली आहे. या योजनेसाठी एकूण ४०००० कोटी रुपयांची गुंतवणूक असेल. त्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रुपाने अनेक रोजगार संधी निर्माण होणार आहेत. या योजनांमधून उत्पादित इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण केले जाईल. याशिवाय, कच्च्या तेलाच्या आयातीवरचे अवलंबित्व कमी होईल.