लखनऊ/ मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणेच आपल्या साखर कारखान्यांमध्ये ऑक्सिजन उत्पादनाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यात इथेनॉल प्लांटमध्ये मेडिकल ऑक्सिजन उत्पादन करण्याचा देशातील पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. त्यानंतर राज्यातील इतर सर्व कारखान्यांत त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. महाराष्ट्रात १९५ साखर कारखाने आहेत. त्यापैकी १३७ कारखान्यांमध्ये इथेनॉल प्लांट आहे. ऑक्सिजन उत्पादन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील शुगर बेल्ट हा ऑक्सिजन बेल्टमध्ये बदलून जाईल.
आम्ही राज्यातील अबकारी खात्याच्या अधिपत्याखालील डिस्टीलरीसह इथेनॉल प्लांटपैकी १५ ठिकाणी उस्मानाबाद पॅटर्न लागू करणार आहोत असे उत्तर प्रदेशच्या साखर उद्योग, ऊस विकास विभाग आणि साखर आयुक्त संजय भूसरेड्डी यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. आम्ही प्लांटच्या माध्यमातून ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पन्न करू शकतो असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील घडामोडींवर नजर राखून असल्याचे भूसरेड्डी म्हणाले.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, पायलट प्रोजेक्ट आणि याची व्यवहार्यता तपासण्यासाठी केंद्र सरकारचे अधिकारी धाराशिव साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अल्कोहोल तंत्रज्ञान, जैव इंधन विभागप्रमुख आणि तांत्रिक सल्लागार प्रा. संजय पाटील म्हणाले, उत्तर प्रदेशच्या साखर आयुक्तांनी आमच्याकडे उस्मानाबादच्या प्रोजेक्टचा अहवाल मागितला होता. तो आम्ही दिला आहे.
धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले, आम्ही ऑक्सिजन उत्पादनासाठी तयार आहोत. आम्हाला मेडिकल क्लिअरन्सची प्रतीक्षा आहे.