नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढती मागणी पाहता भारताने साखर निर्यातीमध्ये एका नव्या उच्चांकाच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. आतापर्यंत ५९ लाख टनाच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली असून यापैकी ४३ लाख टन साखर आधीच देशाबाहेर पाठविण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते भारत या हंगामात निर्यातीमध्ये चांगली कामगिरी करीत आहे.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, देशात मंजूर केलेल्या ६० लाख टनाच्या आपल्या कोट्यापेक्षा अधिक निर्यात होण्याची शक्यता आहे. काही कारखाने सरकारच्या अनुदानाचा लाभ न घेता साखर निर्यात करीत आहेत.
निर्यातीमध्ये कच्ची आणि व्हाइट शुगर या दोन्हींचा समान हिस्सा असल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले. ते म्हणाले, इंडोनेशिया, अफगाणीस्तान आदी देश भारतीय साखरेची मोठी आयात करतात. तर आफ्रिकेसारखे देश कच्च्या साखरेच्या बाजारात प्रमुख म्हणून पुढे आले आहेत. सद्यस्थितीत निर्यात केलेल्या साखरेची एक्स मील किंमत २९०० रुपये प्रती क्विंटल आहे. तर अनुदानाचा विचार केल्यास कारखान्यांना एक चांगला लाभ मिळविण्याची संधी आहे.
२०२०-२१ या साखर हंगामाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने ६० लाख टन साखर निर्यातीसाठी ३५०० कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती. देशांतर्गत बाजारात साखरेचा अतिरिक्त साठा कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सलग दुसऱ्या वर्षी सरकारने साखर निर्यातीसाठी अनुदान जाहीर केले आहे. साखरेचा अतिरिक्त साठा कमी करण्याचा उद्देश त्यामागे आहे. गेल्यावर्षी सुमारे ५९ लाख टन साखर निर्यात करण्यात आली होती. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेनंतरही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेच्या किमतीत सातत्याने वाढ दिसून आली आहे. साखर उत्पादनात जगात अग्रेसर असलेल्या ब्राझीलने आपल्या उसापैकी बहूतांश भाग इथेनॉल उत्पादनाकडे वळवल्याने साखरेच्या उत्पादनात घट दिसून आली होती. त्यामुळे ब्राझीलकडून साखर खरेदी करणाऱ्या अनेक बाजारपेठांनी आता भारताकडे आपला मोर्चा वळवला आहे.