बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे, आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
नवी दिल्ली : चीनी मंडी
देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करण्यासाठी साखरेच्या किमान विक्री दरात (एमएसपी) या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना सावरण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सरकारी साखर कारखान्यांनी सांगितले.
सध्या साखरेचा किमान विक्री दर २९ रुपये किलो आहे. साखरेच्या सरासरी उत्पादन खर्चापेक्षा हा दर ५ ते सहा रुपयांनी कमी आहे. त्यामुळे किमान विक्री दर ३५ ते ३६ रुपये करावा, अशी मागणी साखर उद्योगातून होत होती. पण, सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किमान विक्री दर १ ते २ रुपयांनी वाढवण्याची चिन्हे आहेत.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने किमान विक्री किंमत ३५ ते ३६ रुपये करावी यासाठी सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दर अशा पद्धतीने वाढवल्याने कारखान्यांना किमान त्यांचा उत्पादन खर्च तरी मिळेल आणि शेतकऱ्यांची देणी भागवता येतील, अशी भूमिका असोसिएशनने घेतली आहे.
देशातील सर्वांत मोठी साखर उत्पादक राज्ये असलेल्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानेही केंद्र सरकारला किमान विक्री किंमत वाढवण्यासाठी विनंती केली आहे. साखरेच्या अतिरिक्त साठ्यामुळेच देशात साखरेला उठाव कमी आहे. त्यामुळे कारखान्यांकडे कॅश फ्लो घसरला असून, ऊस बिलाची थकबाकी वाढत आहे. किमान विक्री किंमत वाढवण्यासाठी केंद्र सरकारने साखर उद्योगातील जाणकारांशी आणि विविध राज्यांमधील साखर आयुक्तांशी चर्चा केली आहे.
यंदाच्या हंगामातीलही चांगल्या साखर उत्पादनामुळे साखरेच्या देशांतर्गत बाजारातील किमतीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे कारखाने आर्थिक संकटात आले असून, ऊस बिले थकली आहेत. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने देशातील एकूण ऊस बिल थकबाकी २० हजार कोटी रुपयांच्या पलिकडे जाण्याचे भाकीत वर्तवले होते. ही स्थिती अशीच राहिली तर, येत्या एप्रिलच्या मध्यापर्यंत ऊस बिल थकबाकीचा विषय हाताबाहेर जाण्याची भीती असोसिएशनने व्यक्त केली आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp