फाजिल्का, पंजाब : फाजिल्का केंद्रीय सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी वेतन आणि थकबाकी न मिळाल्याने संप सुरू केला आहे. आपल्या मागण्यांसाठी कारखाना परिसरात कामगारांनी निदर्शनेही केली.
दि ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखाना कामगार संघाचे अध्यक्ष हेत राम आणि महासचिव जतिंदर कुमार यांनी सांगितले की, दोन वर्षांहून अधिक काळापासून कामगारांना वेतन मिळालेले नाही.
आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुबीयांना जानेवारी २०२२ पासून त्यांची थकीत रक्कम मिळालेली नाही. फाजिल्का, जलालाबाद आणि बलुआना येथील आमदारांची याप्रश्नी भेट घेतली आणि या मुद्यावर मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्यात आला. मात्र, काहीच फायदा झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. जर मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत तर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले जाईल आणि राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करू असा इशारा कामगारांनी दिला.