देणी थकविणाऱ्या कारखान्याला ऊस न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

मेरठ : रोहता गावात झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत किनौनी साखर कारखान्याने ऊस बिले थकवल्याने आगामी हंगामात कारखान्याला ऊस न पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर किनौनी कारखान्याचे ऊस खरेदी केंद्रही गावात सुरू करू न देण्याचे ठरले. त्यानंतर ऊस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या कामगारांना शेतकऱ्यांनी पळवून लावले. डुंगर, जटपुरा, भोळा, इंद्रिशपूर या गावांमध्येही ऊस खरेदी केंद्रावरील कामगारांना पळवून लावण्यात आले.

‘लाईव्ह हिंदूस्थान’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, लवकरच जिल्हा ऊस अधिकारी डॉ. दुष्यंत कुमार यांच्याकडे तक्रार करून इतर साखर कारखान्यांचे ऊस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्याचा निर्णय रोहता येथील शेतकऱ्यांनी घेतला. मलियाना ऊस समितीचे अध्यक्ष बिजेंद्र प्रमुख म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.

दरम्यान, किनौनी कारखान्याने सांगितले की, लवकरच ऊस आयुक्तांशी बोलून रोहता व इतर गावांतील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची ऊस केंद्रे बदलण्यात येणार आहेत. अन्य गावांमध्ये किनौनी साखर कारखान्याकडून ऊस खरेदी केंद्रांवर दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र तेथेही शेतकऱ्यांनी त्यांना विरोध केला. बैठकीत रामपाल, कंवरपाल सिंग, बिरेंद्र उर्फ घोल्लू, दीपक, अशोक, सुरेश आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here