पुणे : यंदा राज्यातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना एप्रिलअखेर फक्त २.१ लाख टन साखरेपासून थेट इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. त्यामुळे २०२४ मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण १५ टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट गाठण्यात अडथळे येणार आहेत. खरेतर उसाच्या गळीत हंगामापूर्वी यंदा ७६६ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन होईल असा अंदाज होता. मात्र, निर्बंधांमुळे तितके उत्पादन होण्याची शक्यता नाही.
‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, केंद्र सरकारने १५ डिसेंबर रोजी दिलेल्या निर्देशांनुसार देशातील साखर कारखान्यांना एप्रिलअखेरपर्यंत साखरेपासून १७ लाख टन इथेनॉल निर्मितीस परवानगी आहे. मात्र १५ डिसेंबरपूर्वीच सुमारे ८.५० लाख टन इथेनॉल निर्मिती झाली आहे. सरकारच्या सुधारित आदेशानंतर हंगामाच्या सुरुवातीस दिलेल्या कोट्यापैकी २५ टक्केच कोटा मंजूर केला आहे, अशी माहिती वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) दिली आहे.
दरम्यान, राज्यातील ७२ कारखान्यांना एप्रिलपर्यंत २.१ लाख टन साखरेपासून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. याचा थेट परिणाम इथेनॉल उत्पादनावर होणार आहे. अपेक्षित साखर उत्पादन झाल्यास इथेनॉल उत्पादनासाठी वाढीव कोटा मंजूर होण्याची शक्यता असल्याचेही ‘विस्मा’ने म्हटले आहे. विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले की, सरकारने मागील वर्षाच्या तुलनेत उसाचा रस किंवा पाकापासून फक्त २५ टक्केच इथेनॉल निर्मिती करण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मितीला फटका बसला आहे.