परभणी : अमडापूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स एलएलपी या साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. सन २०२४-२५ करिता गव्हाण व मोळी पूजन समारंभ व्यवस्थापनाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रमेश जाधव यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजा करून करण्यात आला. यावर्षी गाळप होणाऱ्या ऊसास २ हजार ५०० रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा मनोदय व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा जास्तीत जास्त ऊस लक्ष्मी नृसिंह शुगर्सला गाळपास द्यावा, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.
याबाबत कारखाना प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना मागील हंगाम २०२३-२४ साठी परिसरातील कारखान्याच्या बरोबरीने ऊसाचा अंतिम दर २,७०० रुपये इतका मिळणार आहे. यानुसार मागील हंगामातील २,७०० रुपयांपैकी शिल्लक राहिलेल्या हप्त्याची रक्कम १५ डिसेंबरपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. आता नव्या हंगामासाठीची तयारी कारखाना प्रशासनाने पूर्ण केली आहे. पहिला हप्ता २,५०० रुपये देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कारखान्याने आतापर्यंत शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास आणावा असे आवाहन करण्यात आले आहे.