श्रीरामपूर : दोन वर्षांपूर्वी सोयाबीन व कपाशीला चांगला बाजारभाव मिळाला. मात्र, गेल्या वर्षी अवकाळी पावसाचा फटका, तर मान्सूनमध्ये मोठी उघडीप दिल्याने शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर मात करीत पिके जगवली. मात्र हमीभावही मिळाला नाही. गेल्या वर्षापासून हमीभावापेक्षाही कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा कल सोयाबीन व कपाशी लागवडीकडून पुन्हा ऊस पिकाकडे आहे. चालू वर्षी चांगले पर्जन्यमान झाल्याने पाणी मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आपला पिकाचा ट्रेंड बदलला आहे. पुढील वर्षी तालुक्यात जवळपास १० ते ११ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. मध्यंतरी हवामानाचा लहरीपणा व कमी पर्जन्यमानामुळे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कपाशी, मका, गहू, तूर यांसारख्या पिकाकडे वळाला. मात्र तेथेही नुकसान झाल्याने शेतकरी ऊस पिकाकडे वळत आहेत.
श्रीरामपूर तालुक्यातील स्थिती पाहिली तर गेल्यावर्षी अशोक साखर कारखान्याने ६,२४,५८६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यातून ६,४७,८०० साखर पोत्याचे उत्पादन केले. साखरेचा उतारा १०.६३२ इतका मिळाला. कारखान्याने बाहेरून ७० हजार मेट्रिक टन ऊस आणला. तर कार्यक्षेत्रातील एक लाख मेट्रिक टन ऊस इतर कारखान्यांना गेला. चालूवर्षी अशोक कारखान्याने ६ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून ११ टक्के साखर उताऱ्याची अपेक्षा आहे. तर पुढील वर्षासाठी २० हजार हेक्टरहून अधिक उसाची लागवड करण्यात आली आहे. सद्यस्थितीत १३ नोव्हेंबरला अशोक कारखान्याने गळीत हंगामाचा प्रारंभ केला. मात्र, विधानसभा निवडणूक असल्याने मोठ्या प्रमाणावर ऊसतोडणी मजूर मतदानासाठी पुन्हा माघारी गेले. ते आता परतत असून येत्या दोन दिवसांत कारखाना पूर्ण क्षमतेने गाळपास सुरू होईल, कारखान्याच्या शेतकी विभागाकडून सांगण्यात आले.