सांगली : राजारामबापू कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडावी. गळीत हंगामातील उसाचा हप्ताही द्यावा आणि या गळीत हंगामातील उसाला पहिली उचल ४ हजार रुपये व दुसरा हप्ता ५०० रुपये द्यावा अशी मागणी बळीराजा संघटनेने केली आहे. संघटनेच्यावतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली याबाबतचे निवेदन देण्यात आले. उसाचा दर जाहीर न करता कारखाने सुरू ठेवले तर बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. होणाऱ्या नुकसानाला संघटना जबाबदार राहणार नाही. कारखान्याने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत राजारामबापू साखर कारखान्याला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारखान्याने या हंगामात उसाची पहिली उचल ४,००० रुपये व दुसरा हप्ता ५०० रुपये दर जाहीर करूनच ऊस तोडणी सुरू करावी. शेतकरी संघटना व कारखान्याची बैठक घेऊन ऊस दरावर तोडगा काढावा. कारखान्याने २०२३-२४ या हंगामातील राहिलेले बिल द्यावे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते गणेश शेवाळे, तालुकाध्यक्ष तुकाराम मस्के, दत्तात्रय देसाई, कामगार संघटनेचे राजेंद्र साठे, निवास गायकवाड, अशोक सलगर, मनोज घोरपडे आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.