कोल्हापूर : शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्याने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे. सहकार चळवळ टिकली पाहिजे. सहकार चळवळ टिकली तरच सर्वसामान्य जनतेचे हित जोपासले जाईल. सभासद केंद्रस्थानी मानून कारखान्याचे कामकाज चालू आहे. या हंगामासाठी एकरकमी एफआरपी प्रतिटन ३,१४० रुपये देणार असून, या हंगामात १५ लाख मे. टन ऊस गाळप करणार असल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांनी सांगितले.
शिरोळ येथे श्री दत्त कारखान्याच्या ५३ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते गुरुवारी झाला. यावेळी संचालक पाटील बोलत होते. तत्पूर्वी सकाळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले. स्वागत कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी केले. दरम्यान, गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगून सर्व सभासद बांधवानी आपला ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
कारखान्याचे चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी व्हा. चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक अरुणकुमार देसाई, अनिलकुमार यादव, विनया घोरपडे, बाबासो पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, इंद्रजित पाटील, रणजित कदम, बसगोंडा पाटील, अॅड. प्रमोद पाटील, दरगू गोपाळ माने-गावडे, जोतिकुमार पाटील, सिदगोंडा पाटील, सुरेश कांबळे, विजय सूर्यवंशी, महेंद्र बागे, संगीता पाटील- कोथळीकर, अस्मिता पाटील, मलकारी तेरदाळे यांच्यासह कामगार युनियनचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.