कोल्हापूर : गोडसाखर कारखान्याला २००९ सालापासून वेळोवेळी मदत केली आहे. गडहिंग्लजच्या शेतकरी व कामगारांच्या हा उपजीविकेचा प्रश्न असल्याने कारखान्याच्या प्रगतीसाठी अनेक वेळा प्रयत्न केले. डॉ. प्रकाश शहापूरकर यांना जिल्हा बँकेने दिलेल्या अर्थसहाय्याचा योग्य विनियोग करता आला नाही. त्यांनी अपेक्षाभंग केला. या संचालक मंडळाने यावेळी त्या चुका पुन्हा न करता ४ लाख टन उसाचे गाळप करावे. पुढील वर्षी कारखान्याची क्षमता ५ हजार टनांपर्यंत वाढवावी. एक लाख लिटर इथेनॉल प्रकल्प सुरू करावा, तर कारखाना कर्जाच्या खाईतून बाहेर निघेल असे मत आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. येथील गोडसाखर गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
संचालक सतीश पाटील म्हणाले, गोडसाखर अडचणीत असताना आ. मुश्रीफ यांनी मोलाचे योगदान दिले आहे. उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण म्हणाले, डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी संचालकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार केला. साखर आयुक्तांच्या मंजुरीशिवाय बेकायदेशीर व्यवहार झाले आहेत. शिल्लक साखरेची विक्री न झाल्याने कारखान्याला सहा कोटींचा तोटा झाला असल्याचे सांगितले. यावेळी आ. मुश्रीफ यांची सहाव्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल कारखाना व विविध संस्थांमार्फत सत्कार करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे यांनी स्वागत केले. कार्यक्रमास संतोष पाटील, राजेंद्र गड्यान्नावर, संग्रामसिंह कुपेकर, विश्वनाथ स्वामी, विद्याधर गुरबे, बाळासाहेब देसाई, शाम हरळीकर, रामगोंडा पाटील, राहुल शिरकोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. काशिनाथ कांबळे यांनी आभार मानले.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.