शंभू बॉर्डर (पंजाब) : शंभू सीमेवरून ‘दिल्ली कूच’साठी कूच करणाऱ्या शेतकऱ्यांवर सुरक्षा दलांनी अश्रुधुर आणि पाण्याची फवारणी करण्यात आली. हरियाणाच्या शंभू सीमेवरून दिल्लीकडे निघालेल्या १०१ शेतकऱ्यांच्या गटाला शनिवारी दुपारी पोलिसांनी राजधानीत प्रवेश करण्यापासून रोखले.पोलिसांच्या कारवाईमुळे आंदोलनस्थळी तणाव निर्माण झाला. शेतकऱ्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याना रोखण्यात आले.पोलिसांनी अडवलेल्या शेतकऱ्यांनी सुरक्षा दलांना शांततेत निदर्शने सुरू ठेवण्याची विनंती केली. एका शेतकरी नेत्याने बॅरिकेड्समधून पोलिसांशी संवाद साधला आणि म्हणाला, एसपी साहेब, आम्हाला शांततेने दिल्लीकडे कूच करायचे आहे, आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमचे आंदोलन रोखू नका, कृपया आम्हाला रस्ता द्या. आम्हाला पुढे जाण्याची परवानगी दिली पाहिजे. आमचा आवाज दडपला जाऊ नये.
अंबाला पोलीस अधीक्षक म्हणाले, तुम्हाला दिल्लीला जायचे असेल, तर तुम्ही रीतसर परवानगी घ्यावी आणि परवानगी मिळाल्यावर आम्ही तुम्हाला जाण्याची परवानगी देऊ. आम्ही तुम्हाला येथे शांततेने बसून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करतो. सीमेवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हरियाणा सरकारने अंबाला जिल्ह्यात 14-17 डिसेंबर दरम्यान मोबाईल इंटरनेट, एसएमएस आणि डोंगल सेवा तात्पुरती स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. 14 डिसेंबर, सकाळी 6:00 पासून, 17 डिसेंबर, 11:59 PM पर्यंत, डांगडेहरी, लोहगड आणि सदोपूरसह विशिष्ट गावांसातही निर्बंध लागू असतील.