कर्नाटक : ऊस दर वाढीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची निदर्शने

म्हैसूर : ऊसाच्या दरात तत्काळ वाढ करावी या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी सोमवारी शहरात निदर्शने केली. कर्नाटक राज्य शेतकरी संघाने (Karnataka State Sugarcane Cultivators Association) शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ पाहता एफआरपी जादा देण्याची मागणी केली आहे. कर्नाटकनेही उत्तर प्रदेश सरकारचे अनुकरण करणे गरजेचे असल्याचे संघाचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेशात प्रती टन जादा ऊस दर आहे.

संघाचे अध्यक्ष कुरबुर शांता कुमार यांनी सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांना अद्याप ३०० कोटी रुपयांची थकबाकी मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. चालू वर्षात ऊसाच्या शेतीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे आणि उत्पादनही वाढले आहे असे त्यांनी सांगितले. मात्र, ऊसाचे गाळप सुरू झाले असले तरी ऊस दराची घोषणा झालेली नाही. त्यामुळे साखर कारखान्यांना शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे देण्यास उशीर होत आहे.

आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना शांताकुमार म्हणाले की, ऊस शेती करणाऱ्यांना इथेनॉलसारख्या उप उत्पादनांच्या नफ्यापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे सरकारने यासाठी उपाययोजना केली पाहिजे. शेतकऱ्यांना या नफ्यापासून वंचित केले जाऊ शकत नाही. शांताकुमार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी दबाव वाढवावा, एकजूट राखावी असे आवाहन केले. संघाने उपायुक्तांना एक निवेदन सादर केले. या निवेदनात सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरही कार्यवाही झाली नाही तर बेंगळुरू येथे विधानभवनाला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here