व्यापारात भारत-चीनचे एक पाऊल पुढे; साखर उद्योगाला संधी

नवी दिल्ली : चीनी मंडी

जागतिक बाजारपेठेत चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्ध एका वेगळ्याच पातळीवर पोहोचले आहे. दोन्ही देश आता कोणती भूमिका घेतात, याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. या परिस्थितीत भारताला चीनसोबत व्यापार वाढविण्याची चांगली संधी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. चीनची आवाढव्य लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येच्या अन्न सुरक्षेसाठी तेथील सरकारला कृषी उत्पादनांच्या आयातीमध्ये फेरबदल करण्याच्या तयारीत आहे. त्यात अमेरिकेशिवाय इतर देशांमधून आयात वाढवली जाण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा भारतातील साखर उद्योगाला होणार आहे.

चीनमध्ये जास्तीत जास्त निर्यात करण्याच्या संधीची वाट पाहणाऱ्या भारत आणि त्यासारख्या इतर देशांसाठी ही एक नामी संधी चालून आली आहे. मुळात व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीन पहिल्यांदा त्यांच्या नागरिकांच्या अन्न सुरक्षेची व्यवस्था करण्याची शक्यता आहे. त्यासाठीच त्यांचे आयात धोरणात फेरबदल सुरू आहेत. त्यामुळे भारताने आपल्या अॅग्रो-डिल्पोमसीमध्ये एक पाऊल पुढे टाकले आहे.

साखर उद्योगाचा विचार केला, तर भारताच्या चीनला साखर निर्यात करण्याच्या चर्चेला जूनमध्ये सुरुवात झाली. त्या चर्चेचे आता प्रत्यक्ष व्यवहारामध्ये रुपांतर झाले आहे. चीनची सीओएफसीओ या कंपनीशी साखरे बाबत करार झाला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने सीओएफसीओ कंपनीशी ५० हजार टन साखर निर्यातीचा करार केला आहे. भारताच्या वाणिज्य सचिव अनूप वाधवान यांनी चीनला भेट दिली आहे. त्यात त्यांनी चीनच्या शुगर असोसिएशनच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली. चीनची साखरेची गरज मोठी आहे. ती गरज भागवण्याची क्षमता भारताकडे असल्याची हमी वाधवान यांनी चीनच्या शुगर असोसिएशनला दिली आहे.

भारतातील तांदूळ, मांस, औषधे आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील निर्यातदारांना चीनच्या बाजारपेठेत जाण्यासाठी अडथळे आणले जात होते. त्यामुळे भारताने जागतिक व्यापार संघटनेत हा मुद्दा उपस्थित केला होता. पण, परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. तरीही या सगळ्याचे रुपांतर प्रत्यक्ष व्यवहारांमध्ये व्हावे, यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे मत भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या दोन महिन्यांपासून भारतातील अन्न आणि शीतपेयांचे निर्माते चीनच्या बाजारपेठेमध्ये रोड शो आणि सेमीनार सारखे प्रमोशनल कार्यक्रम राबवत आहेत. चीनच्या खाद्य संस्कृतीत सोयाबीनला खूप महत्त्व आहे. त्यामुळे चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची आयात होते. चीनने आता अमेरिकेच्या सोयाबीन आयातीवर २५ टक्के कर लागू केल्यामुळे आता भारतातून चीनला सोयाबीन निर्यात करण्याला प्राधान्य मिळाले आहे. मात्र, यावर चर्चा सुरू असून, अद्याप त्याला मूर्त स्वरूप आलेले नाही.

चीनमधील भारतीय दुतावासाने जाहीर केलेल्या माहितीनुसार भारताच्या वाणिज्य सचिव अनूप वाधवान यांनी चीनचे वाणिज्य सचिव वांग शौवेन यांच्याशी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चर्चा केली आहे. सोयाबीन आणि डाळिंबाविषयीची चर्चा अतिशय समाधानकारक झाल्याचे दुतावासाने म्हटले आहे.

दरम्यान, सोयाबीनला इतर कृषी उत्पादनांनी मागे टाकले आहे. भारताच्या श्री टी अँड इंडस्ट्रिज लिमिटेडने चीनच्या सरकारी सीओएफसीओ या कंपनीशी शंभर कोटींच्या काळ्या चहाचा करार केला आहे. आसामचा दुधामध्ये चांगला मिसळत असल्यामुळे त्याला चीनमध्ये चांगली मागणी आहे.

मुळात चीनमधील बाजारपेठ ही प्रामुख्याने ग्रीन टीची आहे. पण, तेथील तरुणांमध्ये फेसाळेलल्या दुधाच्या चहाची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे तेथे भारताच्या काळ्या चहाच्या पावडरला मागणी आहे, असे चहा मंडळाचे उपाध्यक्ष अरुण कुमार रे यांनी बिजिंगला भेट दिल्यानंतर सांगितले.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here