कोल्हापूर : साखर उद्योगाला गेल्या दोन वर्षांपासून असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ऊस उत्पादकांना एफआरपी नुसार कारखान्यांनी देयके दिलेली नाहीत. यामुळे कुणाचे अर्धे वर्ष, कुणाचे एक वर्षाचे वेतन प्रलंबित आहे. तरीही हे कामगार ऐन ऑक्टोबर हिटमध्ये कारखाना अध्यक्ष वा संचालक असलेल्या उमेदवारांचा प्रचार उपाशीपोटी राहून करत आहेत. सहकारी आणि खासगी साखर कारखान्याचे राज्यात मोठे जाळे आहे. गेली दोन वर्षें साखर कारखान्यांना आर्थिकदृष्टया अतिशय अडचणींचे गेले आहे. कारखाने अजूनही शेतकर्यांना एफआरपीची रक्कम देऊ शकलेले नाहीत.
उत्पादित साखरेला खर्चाच्या तुलनेत दर कमी आहे. याचा परिणाम त्याच्या विक्रीवर झाल्याने सध्या साखर कारखान्यांची गोदामे साखर पोत्यांनी भरून पडलेली आहेत. साखर विक्री होत नसल्याने कारखान्यांची तिजोरी रिकामी आहे. कच्चा माल पुरवठादार, वाहतूकदार, ऊस तोडणी पुरवठादार, ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना कामगार यांची कोटयवधी रुपयांची देणी प्रलंबित आहेत. प्रत्येक साखर कारखान्यात पाचशे ते दोन हजार कामगार काम करतात. काही हंगामी तर बरेचसे बारमाही. परंतु सध्या या उद्यागोतील मंदीने साखर कारखान्याचे अर्थकारण कोलमडले आहे. याचा फटका कारखान्यातील कामगारांना बसला आहे. कामगार संघटित असले तरी नोकरीच्या गरजेपुढे ते फारसा आवाज उठवू शकत नाहीत. दरम्यान, या कामागरांना वेतन नाही मिळाले तरी त्यांना आपल्या सत्ताधारांच्या प्रत्येक राजकीय कार्यात योगदान द्यावेच लागते.
यंदा अशा पद्धतीने राज्यातील तब्बल 50 हजार साखर कामगार उपाशीपोटी त्यांच्या त्यांच्या नेत्यांचा प्रचार करत आहेत. याबाबत बोलताना राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, साखर कारखान्यांची आर्थिक घडी बिघडली असल्याने 60 ते 70 कारखान्यातील 50 हजाराहून अधिक कामगारांचे पगार गेल्या अनेक महिन्यांपासून थकलेले आहेत. याप्रश्नी पुणे साखर आयुक्तालयावर मोठा मोर्चा काढला होता. मागण्यांची पुरेशी दखल घेतली नसल्याने दिवाळी नंतर उग्र आंदोलन करणार आहेत. ऊस दराप्रमाणे वेतनाबाबतही कायदा कडक करण्याची गरज आहे. या सगळयाला अपवाद कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने असल्याचे संघटनेचे कोल्हापूर जिल्हा कोषाध्यक्ष सर्जेराव हळदकर यांनी सांगितले. त्यांच्यामते जिल्ह्यातील दत्त, जवाहर, शरद, गुरुदत्त अशा काही निवडक साखर कारखान्यांचे वेतन दरमहा वेळेवर दिले जाते. मात्र या कारखान्यांच्या कामगारांना आपल्या नेत्यांच्या प्रचारात मात्र भाग घ्यावाच लागतो.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.