सोलापूर : जिल्ह्यात खासगी २३, सहकारी १३ कारखान्यांकडून ऊस गाळप होत आहे. आतापर्यंत एक कोटी १५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. मात्र, अद्यापही ४० लाख टन उसाचे गाळप बाकी आहे. धरण, नद्या, तलावांच्या पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र असल्यामुळे जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम मार्च अखेरपर्यंत चालणार असल्याचा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाने व्यक्त केला आहे.
उसाच्या कमी उपलब्धतेमुळे यंदा गाळप कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे साखर कारखान्यांकडून दर चढाओढीने दिले गेले. परंतु, ऊस तोडणी टोळ्यांचे प्रमाण यंदा घटले. परिणामी काही शेतकऱ्यांनी कर्नाटकातील कारखान्यांना आपला ऊस दिला. काही शेतकऱ्यांचा ऊस जागेवरच वाळला. ऊसाच्या वजनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. याबाबत प्रादेशिक उपसंचालक पांडुरंग साठे म्हणाले की, जिल्ह्यात आतापर्यंत एक कोटी १५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के ऊस क्षेत्राचे गाळप झाले आहे. उर्वरित उसाचे गाळप येत्या काही दिवसांत होईल.