अहमदनगर : ज्येष्ठ नेते, आ. बाळासाहेब थोरात व मी संचालकांच्या मदतीने गणेश कारखाना चांगल्या प्रकारे चालविण्याचा प्रयत्न करीत आहोत. गणेश साखर कारखाना चालविताना विरोधक विविध मार्गांनी अडथळे आणत आहेत. मात्र, त्यावर मात करून लवकरच १ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले जाईल, असे प्रतिपादन सहकार महर्षी कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले. येत्या महिन्यात कारखाना शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट देणार आहे, असे त्यांनी सांगितले. राहाता तालुक्यातील वाकडी येथे ग्रामपंचायतीच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कोल्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार स्नेहलता कोल्हे होत्या.
वाकडी गाव पाणीपुरवठा योजनेचे काम मार्गी लावून पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवू. गणेश कारखाना परिसरात शेतकऱ्यांसह विकासाचे प्रश्न सोडवून या परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यास प्रयत्नशील आहोत. युवकांना रोजगाराची गरज आहे. बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानद्वारे शासनदरबारी सतत पाठपुरावा सुरु आहे. सोनेवाडी व सावळीविहिरला एमआयडीसी मंजूर करुन आणली. औद्योगिक वसाहतीमुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटेल. यावेळी गंगाधर चौधरी, ‘गणेश’चे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, सरपंच रोहिणी बाळासाहेब आहेर, संचालक भगवान टिळेकर, गंगाधर डांगे, संपत चौधरी, नानासाहेब नळे, संपत हिंगे, बाळासाहेब चोळके, अनिल गाढवे, महेंद्र गोर्डे, आलेश कापसे आदी उपस्थित होते.