अहमदनगर : राहाता तालुक्यातील गणेश साखर कारखान्याने गेल्या ६६ दिवसांत १ लाख ६ हजार ६५० मेट्रिक टन उसाचे गाळप करून १ लाख ८ हजार ९०० पोती साखरेचे उत्पादन केले आहे. साखर कारखान्याचा सरासरी साखर उतारा १०.५१ टक्के आहे. कारखान्याच्यावतीने दररोज २,४०० मेट्रिक टन गाळप सुरू आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक नितीन भोसले यांनी दिली. कार्यकारी संचालक भोसले म्हणाले की, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली व चेअरमन सुधीर लहारे यांच्यासह संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली ११ नोव्हेंबरपासून श्रीगणेश साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे.
कार्यकारी संचालक नितीन भोसले म्हणाले कि, कारखाना कार्यक्षेत्रात ऊस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने उसाची लागवड कमी झाली आहे. उत्पादन कमी आहे. जिल्हा बँकेने ४० कोटींचे कर्ज नाकारल्यामुळे कारखाना अडचणीत आला होता; परंतु विवेक कोल्हे यांनी कोल्हे सहकारी साखर कारखान्यामार्फत ऊस, ऊसतोड कामगार उपलब्ध करून दिले आहेत. आर्थिक, प्रशासकीय व तांत्रिक अडचणी दूर केल्या आहेत. उपाध्यक्ष विजय दंडवते व सर्व संचालक मंडळाच्या अथक परिश्रमाने ऊस उत्पादकांचा असलेला विश्वास व पाठिंब्यामुळे कारखाना पूर्ववत चांगल्या पद्धतीने सुरू आहे, असे चेअरमन लहारे यांनी सांगितले.