नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांचा डिझेल इंजिन वाहनांवर अतिरिक्त 10 टक्के कर लावण्याचा प्रस्ताव आहे. 63 व्या ‘सियाम’च्या वार्षिक अधिवेशनात बोलताना गडकरी म्हणाले की, मी हा प्रस्ताव अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पाठवणार आहे. गडकरी यांनी याला “प्रदूषण कर” म्हटले असून देशातील डिझेल वाहनांचा वापर कमी करण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचे सांगितले.
ते म्हणाले की, स्वच्छ ऊर्जेमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा हा एकमेव मार्ग आहे, अन्यथा लोक ऐकण्याच्या “मूड” मध्ये दिसत नाहीत. गडकरींनी वाहन उद्योगाला यासाठी विविधतेला प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. मंत्री गडकरी यांनी दावा केला कि, आम्ही चांगले रस्ते बनवत आहोत, ज्यामुळे ऑटोमोबाईल उद्योगात वाढ झाली आहे, ज्याचा ऑटोमोबाईल उद्योगाला फायदा झाला आहे.
भाषणादरम्यान गडकरींनी वाहन उद्योगाला डिझेल वाहनांचे उत्पादन कमी करण्याची विनंतीही केली. त्यांनी उद्योगांना पेट्रोल आणि डिझेलपासून स्वच्छ इंधनाकडे जाण्याचे आवाहन केले.आम्हाला डिझेल आणि पेट्रोलपासून स्वतंत्र करण्यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घ्यावा आणि आमच्या संक्रमण योजनांमध्ये आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी ऑटोमोबाईल उद्योगाला केले. मंत्री गडकरी म्हणाले की, डिझेल आणि पेट्रोलपासून “जैवइंधन, पर्यायी इंधन आणि गतिशीलतेसाठी ऊर्जा स्त्रोत” मध्ये संक्रमण करण्याची ही योग्य वेळ आहे. त्यांनी अधोरेखित केले की ऑटो उद्योग 2014 मध्ये 7 व्या स्थानावर होता, आता तो 3 व्या स्थानावर आहे. ते म्हणाले, भारतीय वाहन उद्योग 4.5 लाख कोटींवरून 12.5 लाख कोटींच्या उद्योगात बदलला आहे.