नाशिक : राज्यभरातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपुष्टात आल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यात चार साखर कारखान्यांनी मिळून १०,२६,४०६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यामध्ये सटाणा तालुक्यातील द्वारकाधीश साखर कारखाना ऊस गाळपात अव्वल राहिला. कारखान्याने ४,६३,६२१ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यात सरासरी साखर उतारा ६.८१ टक्के राहिला.
गेल्यावर्षीही जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १०,५८,२३८ क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा गाठला होता. यंदा गाळप गेल्यावर्षीपेक्षा कमी झाल्याने हंगाम लवकर आटोपला. साखर उत्पादन कमी झाले. आतापर्यंत साखर उताराही कमी मिळाला. दरम्यान, अहिल्यानगर विभागातील अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात २६ साखर कारखान्यांच्या माध्यमातून यंदा उसाचे गाळप सुरू होते. अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी ७.४६ टक्के, तर नाशिक जिल्ह्यात सरासरी ६.८१ टक्के साखर उतारा आहे. जिल्ह्यातील कादवा (ता. दिंडोरी) ३,२१,०३८.८२२ मेट्रिक टन ऊस गाळप केले. तर द्वारकाधीश (शेवरे, ता. सटाणा) कारखान्याने ४,६३,६२१ मेट्रिक टन गाळप केले आहे. नासाका (ता. नाशिक) कारखान्याने १,२७,०२३ मेट्रिक टन आणि एस. जे. शुगर के. (रावळगाव) कारखान्याने १,१४,७२४.०१२ मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे.