कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील १ ते २६ मार्च या कालावधीतील २६ कोटी १५ लाख रुपयांची ऊस बिले ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहेत. कारखान्याने आतापर्यंत संपूर्ण हंगामाची १६३ कोटी ४२ लाख रुपये ऊस बिले वर्ग केली आहेत. कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील-देवाळेकर व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी ही माहिती दिली. कारखान्याने आतापर्यंत संपूर्ण हंगामातील ५ लाख १० हजार ६८९ टन उसाच्या बिलापोटी सर्व पैसे शेतकऱ्यांना दिलेले आहे, असे त्यांनी सांगितले.
कारखान्याने यंदाच्या हंगामात १२२ दिवसांत ५ लाख १० हजार ६८९ टन उसाचे गाळप करून ६ लाख २९ हजार ३२० क्विंटल साखर उत्पादित केली. सरासरी साखर उतारा १२.३२ टक्के एवढा आहे. अध्यक्ष पाटील व उपाध्यक्ष कवडे यांनी सांगितले की, कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील उसासाठी प्रतिटन ३२०० रुपये ऊसदर जाहीर केला होता. मार्चमध्ये गाळप झालेल्या ८१ हजार ७१९ मेट्रिक टन उसाची २६ कोटी १५ लाख ३७९४ रक्कम संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. संचालक मंडळाने काटकसरीने कारभार करत ऊस उत्पादकांना व कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. आगामी हंगामात सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. यावेळी सर्व संचालक, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे उपस्थित होते.