सांगली : वाळवा तालुक्यातील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये ५ लाख २० हजार ७५० मेट्रिक टन उसाचे गाळप करून, १२.६० टक्के साखर उतारा मिळवून ६ लाख ५६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. कारखान्याने संपूर्ण ऊस बिले व तोडणी-वाहतुकीची रक्कम एकूण १९२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. कारखान्याचे अध्यक्ष वैभवकाका नायकवडी यांनी ही माहिती दिली.
अध्यक्ष नायकवडी म्हणाले की, यंदाच्या गळीत हंगामात आलेल्या संपूर्ण उसाचे प्रती टन ३१०० रुपयांप्रमाणे १६१ कोटी रुपयांचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. तर ऊस तोडणी, वाहतुकीचे ३१ कोटी रुपये कंत्राटदारांच्या खात्यावर जमा केली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याची परंपरा कायम राखली आहे. यावेळी उपाध्यक्ष रामचंद्र भाडलकर, कार्यकारी संचालक समीर सलगर उपस्थित होते.