सातारा : य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ६४ व्या गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली. कारखान्याने सन २०२३-२४ च्या गळीत हंगामातील १०० टक्के ऊस बिले अदा केली आहेत. यंदा गाळपास आलेल्या सर्व उसाचे प्रती टन ३,१०० रुपयांप्रमाणे हंगाम समाप्तीपर्यंतचे ४१८.७० कोटी रुपयांचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहे. कारखान्याच्यावतीने ही माहिती देण्यात आली. कारखान्याने तोडणी, वाहतूकदारांचे बिलही अदा केले आहे, असे सांगण्यात आले.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याने याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याने ६४ व्या गळीत हंगामात अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची क्षमता वाढवली. आता प्रती दिन गाळप क्षमता १२ हजार मेट्रिक टन झाली आहे. गळीत हंगामात कारखान्यात १३ लाख ५० हजार ६५२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. एकूण १५ लाख २० हजार ७२० क्विंटल साखर पोती उत्पादित करण्यात आली आहेत.