नवी दिल्ली : चीनी मंडी
थेट उसाच्या रसापासून तयार केलेल्या इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ केल्यानंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी साखर कारखान्यांसाठी आणखी एक घोषणा केली आहे. साखरेची निर्मिती न करता १०० टक्के इथेनॉल उत्पा: दन करणाऱ्या कारखान्यांना आणखी चांगला दर देऊ, अशी ग्वाही धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.
प्रधान म्हणाले, ‘देशात साखरेचे उत्पादन अतिरिक्त झाले आहे. त्यामुळे आगामी हंगामात साखरेचे उत्पादन मर्यादित राखण्यासाठी इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा हेतू आहे.’
साखर गरजे पुरतीच तयार व्हावी, यासाठी इथेनॉलचे तीन दर जाहीर केले आहेत. याबाबत तेल कंपन्यांच्या परिपत्रकात म्हटले आहे की, यात बी ग्रेड मळीपासून तयार केलेल्या इथेनॉलचा दर ४७.४९ रुपयांवरून ५२.४३ रुपयांवर देण्यात आला. तर थेट उसाच्या रसापासून इथेनॉल तयार झालेल्या इथेनॉलचा दर ५९.१९ रुपये करण्यात आला आहे. तर सी ग्रेड मळीपासूनच्या इथेनॉलचा दर ४३.४६ रुपयेच ठेवण्यात आला आहे. १ डिसेंबर २०१८ ते ३० नोव्हेंबर २०१९ या काळात हा दर राहणार आहे. या निर्णयामुळे इथेनॉल मिश्रित पेट्रोल मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर इथेनॉल उपलब्ध होणार आहे. तसेच साखर कारखान्यांच्या हातात पैसे येऊन त्यांना शेतकऱ्यांची देणी भागवणे शक्य होणार आहे, असे तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.