सोलापूर : सहकारमहर्षी साखर कारखान्याच्यावतीने २३ फेब्रुवारीपासून गाळपास येणाऱ्या सभासद व बिगर सभासदांच्या संपूर्ण उसास प्रती टन शंभर रुपये अनुदान देण्यात येत आहे. कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. सद्यस्थितीत गाळपास आलेल्या उसास कारखान्याच्यावतीने प्रती टन २६०० रुपयांप्रमाणे ॲडव्हान्स अदा करण्यात येतो. २३ फेब्रुवारीपासून गाळपास येणाऱ्या उसाला प्रती टन शंभर रुपये जादा दिले जाणार आहेत, असे मोहिते-पाटील यांनी सांगितले.
कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी सांगितले की, कारखान्याने चालू गळीत हंगामात दहा लाख मे. टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत आठ लाख ६२ हजार ४९० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. ज्येष्ठ संचालक, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व चेअरमन जयसिंह मोहिते- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीपथावर आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यास पाठवावा. यावेळी लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, विजयकुमार पवार, रावसाहेबा मगर, संग्रामसिंह जहागीरदार, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब परांडे, महादेव क्षीरसागर, भीमराव काळे, अमरदीप काळकुटे, गोविंद पवार आदी उपस्थित होते.