मेरठ : उत्तर प्रदेश राज्य साखर महामंडळ लिमिटेडच्या मोहिउद्दीनपूर साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२३-२४ या कालावधीतील १०० टक्के ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत. मंगळवारी कारखान्याच्यावतीने उर्वरीत १७ कोटी रुपयेही ऊस समित्यांच्या खात्यांवर पाठविण्यात आला आहेत. साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक कुमार धर्मेंद्र यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, गेल्या हंगामात कारखान्याने डिसेंबरपर्यंत सर्व ऊस बिले शेतकऱ्यांना दिली होती. मात्र, यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत सहा महिने आधीच सर्व शेतकऱ्यांची ऊस बिले दिली आहेत. आगामी गळीत हंगाम २०२४-२५ साठी कारखान्याने मेंटेनन्सची कामे सुरू केली आहेत, अशी माहिती कुमार धर्मेंद्र यांनी दिली. यावेळीसुद्धा शेतकऱ्यांकडून साफ, स्वच्छ उसाचा पुरवठा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.