कोल्हापूर : शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन करताना आधुनिक तंत्रज्ञानाला प्राधान्य द्यायला पाहिजे. त्यासाठी ऊस संशोधकांनी सुचवलेल्या ऊस लागवड कालावधी, जात, बियाणांची निवड, मशागत, सरी पद्धत, टिपरीतील अंतर, खते, तणनियंत्रण, भरणी व तोडणी या १० सूत्री तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे. त्यातून एकरी १०० टन ऊस उत्पादन सहज शक्य आहे, असे प्रतिपादन पु्ण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी ऊस शास्त्रज्ञ सुरेश बाळासाहेब माने-पाटील यांनी केले. हमीदवाडा (ता. कागल) येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक सह. साखर कारखान्याच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ऊस शेती तंत्रज्ञान जागृती अभियानांतर्गत शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन आणि माजी खा. संजय मंडलिक होते.
यावेळी कारखान्याचे चेअरमन संजय मंडलिक म्हणाले की, कारखान्याने गाळप क्षमता वाढवली आहे. जर संचालक मंडळासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मनापासून काम केले तर कारखाना यंदा ६ लाखांचा गाळपाचा टप्पा पार करेल. यावर्षी महापुराने सुमारे २० गावे बाधित झाल्याने उत्पादनात घट होणार आहे. तालुक्यात चार साखर कारखाने असल्याने उसाचा तुटवडा पडणार आहे. त्यामुळे या वर्षीचा हंगाम आव्हानात्मक असेल. मेळाव्याला व्हाईस चेअरमन शिवाजीराव इंगळे, संचालक तुकाराम ढोले, आनंदा फराकटे, कृष्णा शिंदे, सत्यजित पाटील, धनाजी बाचणकर, महेश घाटगे, कैलास जाधव, प्रकाश पाटील, मंगल तुकान, पुंडलिक पाटील, विश्वास कुराडे, प्रदीप चव्हाण, चित्रगुप्त प्रभावळकर, नंदिनीदेवी घोरपडे, प्रतिभा पाटील आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांनी स्वागत केले. अॅड. वीरेंद्र मंडलिक यांनी प्रास्ताविक केले.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.