विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा कल पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजाराकडे दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत एफपीआयनी भारतीय शेअर बाजारात १०,५५५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. नोव्हेंबर महिन्यात एफपीआयनी भारतीय बाजारपेठेत ३६,२०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली होती. सद्यस्थिती अमेरिकेत महागाई मंदावली आहे आणि तेलाच्या किमतींमध्ये बरीच स्थिरता दिसून येत आहे. याबाबत डिपॉझिटरीकडे उपलब्ध डेटानुसार, एफपीआयनी १ ते १६ डिसेंबर २०२२ या कालावधीत भारतात १०,५५५ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. डॉलर इंडेक्स कमकुवत होणे आणि मोठ्या प्रमाणावर सकारात्मक आर्थिक स्थिती हे त्यामागचे कारण आहे.
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबर महिन्यात ३६,२३९ कोटी रुपयांची खरेदी केली होती. सप्टेंबरमध्येही त्यांनी ७,६२४ कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. परकीय गुंतवणूकदार मुख्यतः भांडवली वस्तू आणि दूरसंचार क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. दुसरीकडे, २०२२ मध्ये, आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून १.२२ लाख कोटी रुपये काढले आहेत. सद्यस्थितीत जगभरातील मध्यवर्ती बँकांनी महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी दीर्घकाळापर्यंत व्याजदर चढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. भारत वगळता, फिलीपिन्स, दक्षिण कोरिया, तैवान, थायलंड आणि इंडोनेशियासह सर्व बाजारपेठांमध्ये डिसेंबरमध्ये नकारात्मक एफपीआय ट्रेंड दिसून आला आहे.