सातारा : किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे ३० नोव्हेंबरपर्यंत गळितास आलेल्या ऊस बिलापोटी ११ कोटी ९१ लाख ८० हजार ५२३ रुपये संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांना प्रती टन ३,००० रुपये दर देण्यात आल्याचे ते म्हणाले. यापूर्वी कारखान्याने ३१ मार्चपर्यंतच्या सोसायटी व्याजापोटी ३० कोटींची रक्कम जमा केली आहे.
व्हाइस चेअरमन शिंदे म्हणाले की, सध्या किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच कोणतीही बँक कर्ज देत नसल्याने व आपल्याला फक्त साखर विक्रीपोटीच पैसे उपलब्ध होत आहेत आणि त्यामुळे आपल्या बिलांना उशीर झाला आहे. चेअरमन आमदार मकरंद पाटील यांनी शब्द दिल्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३,००० रुपये दर दिला आहे. बिलेही जमा केली आहेत. उर्वरित पंधरवड्याची बिलेही लवकरच जमा करण्यात येतील. चेअरमन पाटील यांनी शेतकऱ्यांना हितासाठीच दोन्ही कारखाने ताब्यात घेतले व गाळप यशस्वी करून दाखविले.