मुजफ्फरनगर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे तब्बल ११०० कोटी रुपये थकीत आहेत. साखर कारखान्यांना सुमारे ३१०० कोटी रुपयांचा ऊस पाठविण्यात आला आहे. मात्र, कारखान्यांनी फक्त २००० कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत.
कोरोना महामारीचा फैलाव झाला असतानाही ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुरळीत असल्याचे जिल्हा ऊस अधिकारी आर. डी. द्विवेदी यांनी सांगितले. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा करण्यात कोणतीही अडचण येऊ दिली नाही. जिल्ह्यातील आठ कारखान्यांकडे शेतकऱ्यांनी ३१०० कोटी रुपये किमतीचा ऊस पाठवला आहे. कारखान्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना २०२३ कोटी रुपये दिले आहेत. कारखान्यांकडे सुमारे ११०० कोटी रुपये थकबाकी आहे. कारखान्यांनी शेतकऱ्यांना ६९ टक्के बिले अदा केली आहेत. यामध्ये जिल्ह्यातील खतौली कारखाना पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने ८८ टक्के ऊस बिले अदा केली आहेत.
टिकौला कारखान्याने ८६ टक्के तर मन्सूरपूरने ८५ टक्के ऊस बिले दिली आहेत. जिल्ह्यात भैसाना या एकमेव कारखान्याने अवघे १० टक्के पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत. भैसाना कारखान्याकडे चालू हंगामातील ४०० कोटींची थकबाकी आहे. तर उर्वरीत सात कारखान्यांकडे ७०० कोटी रुपये थकीत आहेत. आपल्या जिल्ह्यातील कारखाने सातत्याने शेतकऱ्यांना ऊस बिले अदा करीत आहेत असे जिल्हा ऊस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत आम्ही ७० टक्के पैसे देण्यात यशस्वी झालो आहोत. यामध्ये अधिक गती आणली जाणार आहे.