नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनकडील (ISMA) उपलब्ध माहितीनुसार, ३१ डिसेंबर २०२१ अखेर देशातील ४९२ साखर कारखान्यांनी ११५.५५ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. तर गेल्या हंगामात, ३१ डिसेंबर २०२० अखेर ४८१ कारखान्यांनी ११०.७४ लाख टन साखर उत्पादित केली होती. गेल्यावर्षी या कालावधीत झालेल्या उत्पादनाच्या तुलनेत ४.८१ लाख टन साखर उत्पादन अधिक झाले आहे.
महाराष्ट्रात यंदा १८९ साखर कारखाने गाळप करीत आहेत. त्यांनी ३१ डिसेंबर २०२१ अखेर ४५.७७ लाख टन साखरचे उत्पादन केले. गेल्यावर्षी समान कालावधीत १७९ कारखान्यांनी ३९.८६ लाख टन साखर उत्पादन केले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ५.९१ लाख टन उत्पादन अधिक झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये ११९ साखर कारखान्यांनी ३०.९० लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्या हंगामात, २०२०-२१ मध्ये याच कालावधीत १२० कारखाने सुरू हते. त्यांनी ३३.६६ लाख टन साखर उत्पादन केले होते. कर्नाटकमध्ये ६९ कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. त्यांनी ३१ डिसेंबर २०२० अखेर ६६ कारखान्यांनी केलेल्या २४.१६ लाख टन साखर उत्पादनांच्या तुलनेत यंदा २५.६५ लाख टन उत्पादन केले आहे.
गुजरातमध्ये चालू हंगामात १५ कारखाने सुरू असून त्यांनी ३१ डिसेंबर २०२१ अखेर ३.५ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्या हंगामात ३१ डिसेंबर २०२० अखेर या कारखान्यांनी ३.३५ लाख टन साखर उत्पादन केले होते. तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये ३१ डिसेंबर २०२१अखेर १२ कारखान्यांनी १.०५ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्या हंगामात समान कालावधीत घेतलेल्या ९४,००० टन साखर उत्पादनापेक्षा हे अधिक आहे. गेल्यावर्षीच्या १९ कारखान्यांच्या तुलनेत तमिळनाडूमध्ये यंदा १५ कारखाने गाळप करीत आहेत. त्यांनी ९२,००० टन साखर उत्पादन घेतले आहे. तर गेल्यावर्षी समान कालावधीत या कारखान्यांनी ७३,००० टन साखर उत्पादित केली होती.
बिहारमध्ये ३१ डिसेंबर २०२१अखेर १.९४ लाख टन, हरियाणामध्ये १.७४ लाख टन, पंजाबमध्ये १.४० लाख टन तर उत्तराखंड मध्ये १.२३ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये १.४० लाख टन साखरेचे उत्पादन ३१ डिसेंबर २०२१ अखेर झाले आहे. इस्माकडून जानेवारी २०२२च्या दुसऱ्या पंधरवड्यात ऊस क्षेत्राची सॅटेलाइट स्थिती पाहणी केली जाणार आहे. त्यावरून चालू हंगामात जानेवारी २०२२ अखेर २०२१-२२ मधील साखर उत्पादनाबाबत निष्कर्ष काढणे शक्य होणार आहे.
साखर कारखान्यांनी दिलेली माहिती आणि इस्माच्या अनुमानानुसार, सरकारने दिलेल्या ४६.५० लाख टन देशांतर्गत विक्री कोट्याच्या तुलनेत नोव्हेंबर २०२१ पर्यंत चालू हंगामात एकूण ४७.५० लाख टन साखर विक्री झाली आहे. सरकारने सप्टेंबरमधील २.५ लाख टन अतिरिक्त कोट्याच्या विक्रीचा कालावधी वाढवून ३१ ऑक्टोबरपर्यंत केला होता. गेल्या वर्षी या कालावधीत साखर विक्री ४५.५० लाख टन कोट्याच्या तुलनेत ४५.६१ लाख टन झाली होती.
१० टक्के इथेनॉल मिश्रणासाठी ४५९ कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. तर ओएमसींनी २०२१-२२ मध्ये पुरवठ्यासाठी ३६६ कोटी लिटर इथेनॉल कोटा मंजूर केला आहे. याशिवाय, ओएमसींनी २५ डिसेंबरपर्यंत जवळपास ९४ कोटी लिटर इथेनॉलची गरज लक्षात घेऊन तिसरा ईओआय जारी केला आहे. त्यासाठी त्यांना ३० कोटी लिटरचे सादरीकरण झाले आहे. सध्या ओएमसींकडून निविदांची तपासणी सुरू असून लवकरच काही दिवसांत कोटा वाटप केला जाणार आहे.