महाराष्ट्रातील गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. साखर कारखाने बंद होण्याचे सत्र सुरू झाले आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्रातील यापूर्वीचे सर्व उच्चांक मोडत असल्याचे दिसून आले आहे. यावर्षी राज्यात उच्चांकी साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार २९ मार्च २०२२ पर्यंत राज्यात २७ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपुष्टात आला आहे. सध्या कोल्हापूर विभागातील २१, नागपूर आणि औरंगाबाद विभागातील प्रत्येकी एक आणि सोलापूर विभागातील चार कारखाने बंद झाले आहेत.
साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये २९ मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्रात एकूण १९७ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला आहे. यामध्ये ९८ सहकारी तर ९९ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ११३१.९१ लाख टन ऊस गाळप करण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत ११७५.९९ लाख क्विंटल (११७ लाख टन) साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३९ टक्के आहे.