सोलापूर : ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून ऊसतोड मुकादमाने ऊस वाहतूकदाराकडून सुमारे १२ लाख रुपये उचल घेऊन फसवणूक केली. ऊस वाहतूकदार विश्वनाथ तानाजी गाडे (रा. चांदज, ता. माढा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऊसतोड मुकादम रतीलाल मोतीराम मालचे (रा. धाडणे, ता. साक्री, जि. धुळे) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी विश्वनाथ तानाजी गाडे यांनी २०२३-२४च्या गळीत हंगामाकरिता आपल्या ट्रॅक्टरने ऊस वाहतूक करण्याकरिता साखर कारखान्याशी करार केला.
ट्रॅक्टरवर ऊसतोडणी कामगारांची आवश्यकता असल्याने फिर्यादीने त्याच्या ओळखीचा मुकादम रतीलाल मोतीराम मालचे यांच्याशी संपर्क करून ऊसतोड मजुरांबाबत विचारणा केली. त्याने कामगार आहेत: परंतु त्यांना अगोदर उचल म्हणून काही रक्कम द्यावी लागते, असे सांगितले. फिर्यादीने मुकादम मालचे यास २८ मार्च २०२३ रोजी कुडूवाडी येथे बोलावून २२ कोयते (४४ मजुरांकरिता) एकूण १२ लाख रुपये उचल म्हणून देण्याचे ठरले. गळीत हंगामातील संपूर्ण रकमेचा हिशोब करून एकमेकांकडे फिरलेली रक्कम एकमेकांना देण्याचे ठरले होते. कारखान्याकडून सुमारे १० लाख रुपये उचल घेतली होती.
फिर्यादीने मुकादमाच्या बँक खात्यावर २ लाख ५० हजार रुपये पाठवले. तसेच त्याचा भाऊ अविनाश मोतीराम मालचे (रा. धाडणे, ता. साक्री, जि. धुळे) याच्या बँक खात्यावर ३ लाख ४९ हजार रुपये पाठवले. तसेच दि. १ जुलै २०२३ रोजी एकूण १२ लाख रुपयांची नोटरी केली. त्यापैकी फिर्यादीच्या नावे ७ लाख रुपयांची नोटरी केली व फिर्यादीची आई शारदा तानाजी गाडे हिच्या नावे ५ लाख रुपयांची नोटरी करून ६ लाख १ हजार रुपये रोख दिले. नंतर मजूरांबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.