कोल्हापूर : जिल्ह्यातील ऊस उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाने तीन वर्षांचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. या मास्टर प्लॅननुसार उसाचे उत्पादन १२५ टन प्रती हेक्टर वाढविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. याबाबत मंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण, विभागीय कृषी संचालक तथा रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, जिल्हा कृषी अधिकारी वाकुरे आदी उपस्थित होते.
याबाबत मंत्री सतेज पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील ऊस संशोधक, कारखान्यांचे कार्यकारी संचालक, कृषी विभाग व बँक अधिकारी, ठिबक व खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व प्रगतशील शेतकऱ्यांच्या सूचनांचा विचार करुन कृषी विभागाने लवकरात लवकर जिल्ह्याचा मास्टर प्लॅन तयार करण्याबरोबरच जिल्हा, तालुका ते गाव स्तरावर कृषी अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समित्या स्थापन करण्यास सूचित केले आहे असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांच्या कार्यपद्धतीत काही बदल करण्याची गरज आहे. जिल्ह्यात १२५ टन ऊस उत्पादन वाढीचे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून एक कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, की प्रती हेक्टर कमी उत्पादन असलेल्या गावांतील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. यासाठी साखर कारखान्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. उमेश पाटील यांनी सांगितले की, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात ऊस उत्पादन सर्वाधिक घेता येणे शक्य आहे. या तीन जिल्ह्यातील सरासरी ऊस उत्पादकता १०० टन प्रती हेक्टरपेक्षा कमी आहे. दर खास उपोययोजना केली तर हे उत्पादन १२५ टन प्रती हेक्टर होईल.
यावेळी कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सुरेश कबाडे व कृषीरत्न पुरस्कार प्राप्त संजीव माने, पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे विशेषज्ञ डॉ. भरत रासकर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी संशोधक सुरेश माने तसेच पश्चिम महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकरी, कृषी अधिकारी उपस्थित होते.