पुणे : राज्य सरकारने अखेर ऊस तोडणी यंत्र (हार्वेस्टर) अनुदानाची सोडत काढली आहे. पहिल्या टप्प्यात ४५३ अर्जांची निवड करण्यात आली आहे. या योजनेतून यंत्र खरेदी करणाऱ्यास किमतीच्या ४० टक्क्यांपर्यंत किंवा कमाल ३५ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यास केंद्र व राज्य शासनाने मान्यता दिली होती. त्यामुळे यंत्र खरेदी करणाऱ्यास सरकारकडून ३५ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. आता पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
या योजनेसाठी राज्यभरातून आठ हजारांहून अधिक अर्ज आलेले आहेत. परंतु अनुदान केवळ ९०० यंत्रांना दिले जाणार आहे. राज्य शासनाने सर्व यंत्रांची एकदम सोडत न काढता पहिल्या टप्प्यात ४५० यंत्रांपुरती सोडत काढली आहे. यंत्र घेण्यासाठी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यानंतरच ३५ लाखांचे अनुदान मिळणार आहे. मोठी भांडवली गुंतवणूक करण्याची क्षमता असलेल्या अर्जदारांनाच ही योजना उपयुक्त ठरेल. तोडणी यंत्र अनुदानाची योजना साखर आयुक्तालयाच्या नियंत्रणाखाली राबविली जात आहे. परंतु सोडत कृषी खात्याच्या ‘महाडीबीटी’ प्रणालीतून काढण्यात आली आहे. अनुदानाची अंतिम रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे.