कोल्हापूर : भोगावती साखर कारखाना आर्थिक अडचणीत असतानाही कारखान्याने इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर दिला आहे. जिल्हा बँकेत कर्जाचा व्याजदर कमी करून १३ कोटी रुपये वाचवले, असे प्रतिपादन भोगावती कारखान्याचे अध्यक्ष, आमदार पी. एन. पाटील यांनी केले.देवाळे येथे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करवीर व राधानगरी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबूराव चव्हाण होते.
आ. पाटील म्हणाले, शासन दरबारी प्रयत्न करून डिस्टिलरीचा १३७ कोटींचा दंड माफ करून घेतला. आगामी काळात डिस्टिलरीतून १२ कोटींचे उत्पन्न कारखान्याला मिळणार आहे. यातून शेतकऱ्यांना जादा ऊस दर देणे शक्य होणार आहे. यावेळी ‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर, पी. डी. धुंदरे, प्रा. शिवाजीराव पाटील, बाबासाहेब पाटील, आनंदराव मगदूम, सुरेश कुसाळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कृष्णराव किरुळकर, एम. आर. पाटील, शिवाजीराव तळेकर, संदीप पाटील, दिगंबर मेडसिंगे, जयदीप आमते, मारुतराव जाधव, शिवाजी कारंडे, सुनील खराडे आदी उपस्थित होते.