नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात देशभरात झालेल्या पावसाचा परिणाम साखर उत्पादनावर झाला आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर लिमिटेडने (NFCSFL) सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात साखर उत्पादन हंगाम २०२२-२३ च्या पहिल्या महिन्यात वार्षिक १४.७३ टक्क्यांची घसरण होऊन ४.०५ लाख टन उत्पादन झाले आहे. २०२१-२२ या हंगामात ऑक्टोबर महिन्यात ४.७५ लाख टन साखरेचे उत्पादन करण्यात आले होते. या वर्षी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साठले आहे. त्यामुळे कारखान्यांना ऊस गाळप सुरू करण्यास उशीर होत आहे. NFCSFL ने २०२२-२३ हंगामात ३६ मिलियन टन साखर उत्पादन होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये नवा गळीत हंगाम सुरू झाला आहे. उत्तर प्रदेश आणि इतर ऊस उत्पादक राज्यांमध्ये काही कारखानेच सुरू होऊ शकले आहेत.
आकडेवारीनुसार, चालू हंगामामध्ये महाराष्ट्रात साखर उत्पादन ८०,००० टनाने कमी झाले आहे. एक वर्षीपूर्वी या कालावधीत १.४० लाख टन उत्पादन झाले होते. कर्नाटकमध्ये साखर उत्पादन २.८० लाख टन झाले होते. एक वर्षापूर्वीच्या उत्पादन झालेल्या ३.१ लाख टनापेक्षा ते कमी आहे. मात्र तामीळनाडूमध्ये साखरेचे उत्पादन या हंगामात ऑक्टोबर महिन्यात ४५,००० टन अधिक झाले आहे. एक वर्षापूर्वी समान कालावधीत ते २४,००० टन होते. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात देशात १३४ कारखाने सुरू राहिले. तर एक वर्षापूर्वी या कालावधीत १६० कारखाने सुरू होते.