नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये(MSP) वाढ करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच बैठकीतील या निर्णयामुळे बळीराजाला दिलासा मिळाला.
तांदूळ २,३०० रुपये प्रतिक्विंटल जो खर्चाच्या किमतीपेक्षा ५० टक्के अधिक आहे. ज्वारी ३,३७१ रुपये, बाजरी २,६२५ रुपये, रागी ४,२९० रुपये, मका २,२२५ रुपये, प्रतिक्विंटल तृणधान्यामध्ये तूर ७,५५० रुपये, मूग ८,६८२ रुपये, उडीद ७,४०० रुपये प्रतिक्विंटल, अशी आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे.तेलबियांमध्ये शेंगदाणा ६,७८३ रुपये, सूर्यफूल ७,२८० रुपये, सोयाबीन ४,८९२ रुपये, शीशम ९, २६७ रुपये, नायजर सीड ८,७१७ रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली.नगदी पिकांमध्ये कापूस मध्यम धागा ७,१२१ रुपये, तर लांब धागा कापूस ७,५२१ प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. याशिवाय, वायू ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ७,४५३ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना संबोधित करताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा तिसरा कार्यकाळ अत्यंत महत्त्वाचा असून शेतकरी हिताचे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले जात आहेत. मोदी सरकारच्या दोन टर्ममध्ये आर्थिक विकासाचा भक्कम पाया घातला गेला असून तिसऱ्या टर्ममध्ये लोकांच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, असे ते म्हणाले.ते म्हणाले, आजच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना एमएसपी म्हणून सुमारे लाख कोटी रुपये मिळणार आहेत. मागील हंगामाच्या तुलनेत हे 35,000 कोटी रुपये अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के अधिक भाव देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि त्या उद्देशाने निर्णय घेण्यात आले आहेत.तेलबिया आणि कडधान्यांसाठी मागील वर्षाच्या तुलनेत एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढीची शिफारस करण्यात आली आहे.