सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने २०२३-२४ च्या गळीत हंगामात १३७ दिवसांत १३ लाख ५० हजार ६५२ टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याने हंगामात १५ लाख २० हजार ७२० क्विंटल साखर पोती उत्पादन घेतले आहे, अशी माहिती उपाध्यक्ष जगदीश जगताप यांनी दिली. गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते. अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची घोडदौड सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मनोज पाटील व मनस्वी पाटील यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा झाली. कार्यकारी संचालक सी. एन. देशपांडे म्हणाले, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहकार्याने गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडला. ऊसतोडणी वाहतूकदार, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालक धोंडीराम जाधव, संजय पाटील, बाजीराव निकम, अविनाश खरात, प्र. कार्यकारी संचालक बालाजी पबसेटवार, मनोज पाटील, एस. डी. कुलकर्णी, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी उपस्थित होते.