कोल्हापूर : अथणी शुगर्स लिमिटेडच्या शाहूवाडी युनिटचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीत मात करीत फक्त ४५ दिवसांत १,६०,००० मे. टन गाळप पूर्ण करत १,५१,००० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. ११ नोव्हेंबरपासून गाळप सुरू असून सरासरी साखर उतारा ११.१० टक्के आहे. कारखान्याने प्रती टन ३२०० रुपयांप्रमाणे ऊस बिले सभासदांच्या खात्यावर जमा केली आहेत, अशी माहिती, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांनी दिली.
एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील म्हणाले की, गेल्यावर्षी कारखान्याचे विस्तारीकरण करण्यात आल्यापासून दैनंदिन गाळप ५,५०० मे. टन. प्रतिदिन चालू आहे. कारखान्याने १५ डिसेंबरपर्यंत गाळपासाठी आलेल्या सर्व ऊस बिलाची रक्कम दिली आहे. कारखान्याने एफआरपीपेक्षा जास्त दर देण्याची परंपरा सुरू ठेवत प्रती टन ३,२०० रुपये ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. हंगामात उच्चांकी सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्ट पूर्तीसाठी कारखान्यास सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले. यावेळी संचालक, कार्यकारी संचालक श्रीनिवास पाटील, युनिट हेड रविंद्र देशमुख आदी उपस्थित होते.