सांगली : राजेवाडीच्या सद्गुरु श्री श्री कारखान्याने गेल्यावर्षीचे १५ कोटी ९० लाख ६८ हजार रुपये एफआरपी दिलेली नाही. कारखान्याला ही रक्कम शासनाकडून मिळालेली असूनही त्यांनी अद्याप ती शेतकऱ्यांना दिलेली नाही. यासंदर्भात बळीराजा संघटच्या वेळोवेळी झालेल्या आंदोलनानंतर आणि पाठपुराव्यामुळे आज (१३ डिसेंबर) याप्रश्नी कारखाना प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. तहसील कार्यालयात ही बैठक होणार असल्याची माहिती बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. उन्मेश देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.
याबाबत देशमुख यांनी म्हटले आहे की, सद्गुरु श्री श्री कारखान्याने गेल्यावर्षी आधीच्या २५०० रुपये दराप्रमाणे केवळ ११.०८ टक्के रिकव्हरीप्रमाणे ऊस बिले दिली. खरेतर २०२१-२२ मध्ये रिकव्हरी ११.८२ टक्के होती, त्यानुसार २१ कोटी ६३ लाख ९८ हजार रुपये देणे गरजेचे होते. कारखान्याने यातील ५ कोटी ७३ लाख ३० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. उरलेली १५ कोटी ९० लाख ६८ हजार रुपये येणे बाकी आहे. ही रक्कम सरकारच्या निर्णयानुसार, २०२२-२३ च्या हंगामास लागू होत असल्याने त्या वर्षीची ११.८२ टक्के रिकव्हरी होते. शासनाकडून पैसे मिळूनही कारखाना शेतकऱ्यांचे देणे रक्कम बुडवतो आहे. आटपाडी तहसीलदारांसमवेत जर यावर तोडगा नाही निघाला तर आम्ही तीव्र आंदोलन करू. शेतकऱ्यांना घेऊन हंगाम बंद पाडू असा इशारा डॉ. उन्मेश देशमुख यांनी दिला आहे.