नवी दिल्ली : देशात खाद्यतेलाची आयात १७.३७ टक्क्यांनी वाढून विक्रमी पातळीवर पोचली आहे. नुकत्याच संपलेल्या तेल विपणन वर्षात देशात १६५ लाख टन खाद्यतेल आयात झाली आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी आयात शुल्कात मोठी कपात केली होती. याचदरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव कमी झाले होते. त्यामुळे आयात वाढल्याचे सॉल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे.
केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे सध्या खाद्यतेलाचे दर २०२१-२२ च्या पातळीवर आहेत. सध्या कच्चे सोयातेल, कच्चे सूर्यफूल तेल आणि कच्चे पामतेल आयातीवर ५.५० टक्के शुल्क आहे. तर रिफाईंड सोयातेल, पामतेल आणि रिफाईंड सूर्यफूल तेलावर १३.१७ टक्के आयातशुल्क आहे. दरम्यान, २०२१-२२ च्या वर्षातील आयात १४० लाख २९ हजार टन होती. यंदा विक्रमी १६५ लाख टन खाद्यतेलाची आयात झाली आहे, असे सॉल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक भारत मेहता यांनी सांगितले.