मेरठ : मवाना साखर कारखान्याच्या प्रशासनाने २०२०-२१ हंगामातील १७.६३ कोटी रुपयांची ऊस बिले संबंधित समित्यांकडे पाठविली आहेत.
ऊस बिलांबाबत माहिती देताना कारखान्याचे महा व्यवस्थापक तथा प्रशासन अधिकारी प्रमोद बालियान म्हणाले, कारखान्याने १२ फेब्रुवारीपर्यंत खरेदी केलेल्या ऊसापोटी ३५९.२२ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. कारखान्याने आतापर्यंत ५६ टक्के ऊस बिले अदा केली आहेत. उर्वरीत पैसेही लवकरच दिले जातील. कारखान्याकडून विक्री केलेल्या साखरेच्या ८५ टक्के रक्कम नियमानुसार शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी दिली जात आहे. शेतकऱ्यांना लवकर ऊस बिले देण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यात कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही.
सध्या कारखान्याच्या वतीने ऊस सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याचे महा व्यवस्थापक बालियान यांनी सांगितले. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी ऊस विभागाच्या निर्देशानुसार ऑनलाइन घोषणापत्र द्यावे आणि उसाच्या सर्व्हेमध्ये सहभाग नोंदवावा. शेतकऱ्यांनी सर्व्हेला सहकार्य करावे असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे.