नाशिक : निफाड तालुक्यातील शिंगवे गावात सोमवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत १७ एकराहून अधिक क्षेत्रातील ऊस पिक जळून खाक झाले. याबाबत गावातील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी भाऊलाल कोरडे यांच्या शेतात सायंकाळी सहा वाजता आग लागली. रात्री ११ वाजेपर्यंत या आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नव्हते. आग आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत जवळपास १७ एकरातील ऊस नष्ट झाला. वीज वितरण कंपनीच्या ओव्हरहेड तारांतील ठिणगीमुळे आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. खूप कमी वेळात आग सगळीकडे पसरली.
द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पिकाच्या नुकसानीचा पंचनामा केला जात आहे. आतापर्यंत १७ एकरातील ऊस पिक जळाले आहे. आग लागण्याच्या कारणाचा उलगडा झालेला नाही असे एका अधिकाऱ्याने सांगितले. शेतकऱ्यांच्या आरोपांनंतर आमच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली आहे.