छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील तीन व खानदेशमधील दोन जिल्ह्यांतील एकूण १७ कारखान्यांनी १२ लाख ५५ हजार २ टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. आतापर्यंत सरासरी ६.९८ टक्के साखर उतारा राखत ८ लाख ६४ हजार ४४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभागी होण्यासाठी २१ कारखाने पुढे आले होते. त्यापैकी प्रत्यक्ष १७ कारखान्यांनी ऊस गाळप करण्याला सुरुवात केली आहे. यंदाच्या उस गाळपात सहभागी होणाऱ्या १७ कारखान्यांमध्ये नऊ सहकारी, तर आठ खासगी कारखान्यांचा समावेश आहे.
‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, नंदुरबार व जळगावमधील प्रत्येकी एक, छत्रपती संभाजीनगरमधील चार, जालन्यातील चार व बीडमधील सात कारखाने गाळप करीत आहेत. नऊ सहकारी कारखान्यांनी ४,२७,२६४ टन उसाचे गाळप केले. तर आठ खासगी कारखान्यांनी ६,२७,७३८ टन ऊस गाळप केले. सहकारी कारखान्यांनी सरासरी ६.७ टक्के उतारा राखत २,८६,४७० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर खासगी कारखान्यांनी सरासरी ६.९८ टक्के साखर उतारा राखत ५,७७,९७० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.