Image Credits: fijione.tv
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
ऊसदरावरुन सुरुवातीस पेटलेल्या संघर्षानंतर यावर्षीचा गळीत हंगाम पूर्णत्वाकडे जात आहे. जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांपैकी १८ कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण झाला असून केवळ सहा कारखाने सुरू आहेत. मार्चखेर सर्व कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण होणार आहे. १५ मार्चपर्यंत गाळप झालेल्या उसापोटी जिल्ह्यातील उत्पादकांना दोन हजार ६१८ कोटी २२ लाख एफआरपी कारखान्यांनी दिली असून अद्याप ५७६ कोटी ९ लाख रुपयांची एफआरपी देणे बाकी आहे.
बाजारपेठेत साखरेला असलेला चांगला दर आणि केंद्र सरकारने एफआरपीमध्ये केलेल्या वाढीमुळे यावर्षीचा गळीत हंगाम ऊस उत्पादकांना चांगला फायदेशीर ठरेल असा अंदाज वर्तवला जात होता. तरीही हंगामापूर्वीच ऊसदरांवरुन संघर्षाची ठिणगी पेटली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर एफआरपी अधिक २०० रुपये दोन टप्प्यात देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पहिल्या पंधरवड्यामध्ये उत्पादकांना ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार कारखान्यांकडून एफआरपी मिळाली. पण त्यानंतर साखरेच्या दरात घसरण होत गेल्यानंतर उत्पादकांना एफआरपी वेळेत मिळण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या. ठरल्याप्रमाणे एफआरपी देण्यास साखर कारखाने बांधिल असल्याचे कारखानदारांकडून स्पष्ट केले जावू लागले, तरी हंगामाच्या मध्यावरच एफआरपीमध्ये ५०० रुपये कमी करण्यात आले. कारखानदारांच्या एकतर्फी निर्णयाविरोधात उत्पादक व शेतकरी संघटनांनी प्रादेशिक साखर सहसंचालक व साखर आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली. यानुसार कारवाइची प्रक्रिया सुरू असली, तरी सद्य:स्थितीत हंगाम पूर्णत्वाकडे जात आहे.
जिल्ह्यातील २३ कारखान्यापैकी २२ कारखान्यांनी गळीतास सुरुवात केली होती. त्यामध्ये १५ सहकारी व सात खासगी कारखान्यांचा समावेश होता. या सर्व कारखान्यांनी १५ मार्चपर्यंत १२.४५ सरासरी उताऱ्यांना एक कोटी ७० लाख मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. गाळप झालेल्या ऊसापोटी उत्पादकांना जिल्ह्यातील कारखान्यांनी दोन हजार ६१८ कोटीची एफआरपी दिली असून अद्याप साखर कारखान्यांकडे ५७६ कोटीची एफआरपी थकीत आहे.
हंगामाच्या सुरुवातीनंतर साखर दरात झालेल्या घसरणीमुळे उत्पादकांना पूर्ण एपआरपी मिळालेली नाही. साखर दरांमुळे साखर उद्योग पर्यायाने उत्पादकांसमोर निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवण्याबरोबरच निर्यात शुल्क शून्य टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाचा फायदा होण्यास काही काळ जावा लागणार असल्याने उत्पादकांना पूर्ण बिले मिळण्यास काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गळीत सुरू असलेले कारखाने
तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, छत्रपती शाहू साखर कारखाना, जवाहर साखर कारखाना, दत्त-शिरोळ, गुरुदत्त शुगर्स, दालमिया (आसुर्ले-पोर्ले) या जिल्ह्यातील सहा कारखान्यांचा गळीत हंगाम अद्याप सुरू आहे. सुरू असलेल्या सर्वच कारखान्यांनी गळीत हंगाम सांगता समारंभाची तारीख जाहीर केली असून मार्चअखेर सर्व कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण होणार आहे.
जिल्ह्यातील उत्पादकांना मिळालेली एफआरपी – २,६१८ कोटी २२ लाख
थकीत एफआरपी – ५७६ कोटी नऊ लाख
विभागातील कारखान्यांनी दिलेली एफआरपी – ४,१७७ कोटी ४३ लाख
विभागातील थकीत एफआरपी – ८०६ कोटी ३९ लाख