पुणे : परवाना घेण्याआधीच २०२१-२२ या हंगामात गाळप सुरू करणाऱ्या महाराष्ट्रातील १८ साखर कारखान्यांना राज्याच्या साखर आयुक्तांनी दंड ठोठावला आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेले वृत्तानुसार, महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, या कारखान्यांना ६१ कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
साखर आयुक्त कार्यालयाकडून हंगाम सुरू होण्यापूर्वी गाळप परवाने जारी केले जातात. या परवान्यांशिवाय कारखान्यांना हंगाम सुरू करण्याची परवानगी नाही. लायसन्स जारी करण्यापूर्वी साखर आयुक्त कार्यालय ऊसाची उपलब्धता, गेल्या हंगामातील थकबाकी, संबंधीत कारखान्याची सरकारी देणी अशा सर्व बाबींची तपासणी केली जाते. जर एखादा कारखाना देणी देण्यात अपयशी ठरला असेल तर साखर आयुक्त त्यांना पुढील हंगामासाठी परवाने देण्यास नकार देतात. विना परवाना गाळप सुरू करणाऱ्या कारखान्याला प्रती टन ५०० रुपये दंडाची आकारणी केली जाते.
महाराष्ट्रात २०२१-२२ या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर कारखान्यांनी सहभाग घेतला आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार हंगाम २०२१-२२ मध्ये १९ जानेवारी २०२२ अखेर महाराष्ट्रात एकूण १९२ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९५ सहकारी आणि ९७ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ६२५.३८ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ६२०.८२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.९३ टक्के आहे.