नवी दिल्ली : देशात यंदा साखर उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ४९ लाख टनांनी कमी होऊन २७० लाख टनांवरच स्थिरावण्याची शक्यता आहे. ३१ जानेवारीअखेरच्या ऊस गाळप आढाव्यानुसार देशात एकूण ४९४ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला असून त्यांनी १,८५५ लाख टन ऊस गाळप केले आहे. परिणामी जानेवारीअखेर देशपातळीवर १६५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा देखील ८.९१ टक्के आहे. गेल्यावर्षी समान कालावधीत ५१७ कारखान्यांनी गाळप करून १,९३१ लाख टन गाळप केले होते. आणि ९.७० टक्के साखर उतारा घेत १८७ लाख टन उत्पादन घेतले होते. आतापर्यंत साखर उताराही कमी मिळाला असल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने स्पष्ट केले. कमी ऊस उपलब्धतेमुळे यंदाचा हंगाम लवकर आटोपण्याची चिन्हे आहेत.
अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, यंदा इथेनॉल उत्पादनाकडे वळणारी साखर आणि निर्यात मार्गाने देशाबाहेर जाणारी साखर लक्षात घेता कदाचित हंगाम अखेर नीचांकी साखरेचा साठा शिल्लक राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे गाळप हंगाम उशीरा म्हणजे १५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. आधी दुष्काळसदृश्य स्थिती, नंतर अती पाऊस, काही ठिकाणच्या परतीच्या पावसाने महाराष्ट्र, कर्नाटकातील बऱ्याच भागातील उभ्या उसावर तुरे आले आहेत. त्यामुळे उसाची वाढ खुंटल्याचे तसेच त्यातील साखरेचे प्रमाण घटल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, या भागातील कारखान्यांचा गाळप हंगाम अपेक्षेपेक्षा लवकर आटोपला जाण्याचा अंदाज आहे. केंद्र शासनाने १० लाख टन साखर निर्यातीचा तसेच इथेनॉलचे जाहीर केलेले नवे खरेदी दर, यामुळे साखर उद्योगाला मदत झाली आहे. आता साखरेच्या एमएसपीचा निर्णय झाल्यास त्याचे महासंघातर्फे स्वागत आहे, असेही पाटील यांनी सांगितले.